अध्यक्ष = श्री . बी. के. अहिरे . पाटणे .
---------------------------------------------------------------------------------.
कॊरॊनाने काढता पाय घेताच सर्वच क्षेत्रात हालचाली सुरु झाल्यात . मग पाटणे ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळी तरी मागे का राहावी . रोज सकाळी कट्ट्यावर येणारे सभासद गप्पा-टप्पा करताना बऱ्याच दिवसात आपण कोठे बाहेर पडलो नाहीत , कंटाळा आला आहे घरात बसून नेहमीची उष्टी- खरकटी काढून जीव मेटाकुटीला आला आहे . वगैरे -वगैरे म्हणायचे . मतितार्थ बाहेर पडायला हवे . आणि शेवटी सर्वानी एक दिवसीय सहल , सर्वाना सहज परवडेल अशी व सूर्यास्त होईस्तोवर घरी परतता येईल अशी म्हणून वैतरणा . दारणा धरण व्हाया त्र्यम्बकेश्वर जावयाचे निश्चित झाले.
दिनांक १३ नोव्हेंबर २०२२ रविवारी क्रेझरने जावयाचे ठरले .सकाळी ६ वाजता सर्व सभासदांनी नेहमीच्या कट्ट्यावर जमावे . जेवणाचे डब्बे ;पाणी ; औषधे घ्यावीत . असे ठरले , एकदाचा रविवार उजाडला . त्या दिवशी नेमके सहल प्रमुख श्री. मोतीलाल बागुल व त्याच्या श्रीमती अचानक एका जवळच्या नातेवाईकाचे निधन झाल्याने येऊ शकले नाही . तरी ही ५ महिला व ५ पुरुष असे एकूण १० सभासद मित्र सहलीत सहभागी झाले . बरोबर ६. ५ वाजता आम्ही पाटणे सोडले . चांदवड ;म्हसरूळ ;नाशिक मार्गे ९ वाजता त्रयंबकेश्वर गाठले. रविवार असल्याने यात्रेकरूंची तुफान गर्दी दिसत होती आम्ही सारे ८०+ असल्याने गर्दीत जाऊन दर्शन घेणे अवघड. शेवटी कळस दर्शन घेऊन आम्ही बाहेर म्हणजे वैतरणा मार्ग धरला .
गावाबाहेर पडताच दुतर्फा पर्वत रांगा ;मधून भात शेती दिसू लागली. चौफेर पसरलेल्या सह्याद्रीच्या हिरव्यागार वृक्षराजी ; गगनचुंबी शिखरे . नुकताच पावसाळा संपलेला .त्यामुळे शेतकरी हंगामाची आवराआवर करीत होता. गुरांसाठी वर्षभर पुरेल असा चारा गोळा करून त्याची साठवण करीत होता . तर गुराखी शेळ्या मेंढ्याचे कळप चारण्यासाठी बाहेर पडत होता . सकाळ असल्याने तशी सर्वत्र शांतताच दिसून येत होती . पाण्याची तळी ; डबकी छोटेमोठे तलाव ;खळखळणारे झरे पाहता पाहताच नजर पुरणार नाही असा जलसागर दिसू लागला. तितक्यात कोणी तरी साद घातली वैतरणा आले . अन ते वैतारणाचं होते .
भारत स्वतंत्र होण्यापूर्वी भविष्यवेधी ब्रिटीशानी मुबईची तहान भागविण्यासाठी व मुंबईला वीज पुरवठा व्हावा म्हणून वैतरणा धरण बांधले . धरणाचे स्वरूप ; आकारमान विस्तीर्ण आणि अनेक टेकड्या मधून असल्याने इतर धरणा सारखे एका दृष्टीक्षेपात दिसून येत नाही . नैसर्गिक रचनेमुळे सारे काही विलोभनीय झाले आहे . दूरवर पसरलेले पाणी सागरच. लाटांचा कानावर पडलेला आवाज एक मोहिनी घालतो असे वाटते .
इतक्यात सुरक्षित जागा पाहून गाडी चालकाने थांबा घेतला . पाच तासाचा प्रवासाने सर्वाची गात्रे कुरकुरत होती. लगबगीने सारे खाली उतरले. आळोखे पिळोखे देऊन थकवा झटकू लागले . काही मंडळी मोकळे व्हावे म्हणून आडोसे शोधू लागली . सारा आसमंत सर्वत्र पसरलेली निळाई . मन आणि डोळे तृप्त . फोटो सेशन झाले सुरु . महिलांचे ग्रुप फोटो ;पुरुषांचे ग्रुप फोटो ; धरणाचे फोटो ;पक्षाचे फोटो सेल्फी फोटो. मनसोक्त फोटो काढून झालेवर लगेच फोटो फरवर्डिंग . एकदाचा खेळ संपला . गाडीचा हॉर्न वाजला ; चलो रे चलो .
आता गाडीने रस्ता धरला दारणा धरणा चा . घोटी व राष्ट्रीय महामार्ग . परिसरात तांदूळ ची शेती ; कारखाने तांदुळा चे .. पुढे मात्र रस्ता खड्ड्याचा ; धुळी चा अन कारखान्याचे धुराचा . पाच -दहा मिनिटात सारे निवळले . पुन्हा दारणा ची निळाई दिसू लागली .
वैतरणा परिसरापेक्षा दारणा परिक्षेत्र सुधारित भातशेती ; नागरी वस्ती. दुकाने ;रेखीव घरे ; बंगले; कारखाने यांची रेलचेल असलेले दिसत होते .पुरुष मंडळी यावर चर्चा करीत असताना महिला मात्र घर व एकमेकांची उणीदुणी यातच गुंतलेल्या दिसत होत्या . घोटी ते सिन्नर मार्ग उसाचे मळे ; भातशेतीची खाचरे ; भाजीपाला यांनी समृद्द . आजू बाजूचे कालवे व बागाईत शेती पाहून दारणा ची चाहूल लागली .. समोर धरणच दिसू लागले . हे धारण हि ब्रटिशांची च देणगी . धारण प्रेक्षणीय आहे पण आपल्या शासनाचे दुर्लक्ष्य पावलो पावली जाणवत होते . परिसर बेबंद झाडी ; चिखल ; कचरा यांनी बरबटलेला . सारे निराश झाले . शेवटी एक हॉटेल पाहून बरोबर आणलेले डबे जवळ केले ; काही मंडळीने मात्र कटरा माशांची ऑर्डर दिली
सर्वांची वामकुक्षी होताच आवरा आवर सुरु झाली . हॉटेल चे बिल देऊन झाले . हॉटेल मालक खूप चांगले होते. त्यांनी सर्वाना शुभेच्छा दिल्या . आम्ही हि त्याचे आभार मानले व निरोप घेतला.
आम्ही बरोबर चार वाजता घरी म्हणजे पाटणे येथे परतलो . सर्वानी एकमेकांना शुभेच्या देऊन पुन्हा भेटूया असे म्हणून निरोप घेतला


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा